स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित सुपारीची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध भांडुप पोलिसांनी मोठी कारवाई केली. नाहूर येथील महानगरपालिका पार्किंग, व्हिलेज रोड परिसरात पोलिसांनी पहाटे छापा टाकून तब्बल १ कोटी १८ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच वाहने आणि नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारीच्या वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना करण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजून २५ मिनिटांनी नाहूर येथील महानगरपालिका पार्किंग, व्हिलेज रोड परिसरात सापळा रचला.
यावेळी पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी केली असता एका कंटेनरसह दोन टेम्पो, एक बोलेरो आणि एका पिकअप अशा पाच वाहनांमधून प्रतिबंधित सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये ‘वाराणसी आशिक’ सुगंधित सुपारी तसेच सुगंधित तंबाखूचा समावेश असून, जप्त केलेल्या प्रतिबंधित पदार्थांची किंमत २० लाख २१ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत पाच वाहनांची किंमत सुमारे ९८ लाख रुपये असून, प्रतिबंधित पदार्थ आणि वाहनांसह एकूण १ कोटी १८ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी पाचही वाहने तसेच नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा (कायदा व सुव्यवस्था), अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी (पूर्व प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख (पूर्व परिमंडळ-३), सहाय्यक पोलीस आयुक्त अजय जोशी (भांडुप विभाग) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना धिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड, पोलीस हवालदार हिरालाल चरांडे, मुकेश तिरमारे, गणेश सोनवणे, पोलीस शिपाई विकास शिंदे आणि विजयकुमार पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

