स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी हरियाणा, बिहार आणि मुंबई येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५० भारतीय पासपोर्ट, सहा संगणक व लॅपटॉप, नऊ मोबाइल, १३ बँक चेकबुक, डेबिट कार्ड तसेच आधार, पॅन व मतदान ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
मशीद बंदर पश्चिम येथील ‘अल शिफा ट्रॅव्हल्स’च्या कार्यालयातून आरोपी परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालत होते. नोकरीच्या आमिषाने इच्छुकांकडून मूळ पासपोर्ट, बायोडाटा व इतर कागदपत्रे घेऊन प्रत्येकी १५ हजार रुपये आकारले जात होते. पैसे आणि कागदपत्रे घेतल्यानंतर नोकरी न देता आरोपी कार्यालय बंद करून तसेच मोबाइल बंद करून पसार झाले.
या प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पायधुनी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. त्यातून तबरेज आलम अन्सारी याला हरियाणा, मोहम्मद शमीम अन्सारी याला मधुबनी, बिहार येथून, तर व्यंकटेश गंगय्या चकल याला मुंबईतील जे. जे. धर्मशाळा, टँकर स्ट्रीट परिसरातून अटक करण्यात आली. आतापर्यंत दहा जणांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, जप्त झालेल्या ५० पासपोर्टमुळे पीडितांची संख्या ५० पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आरोपींकडून बनावट नियुक्तीपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे या टोळीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली, तसेच त्यांच्याकडून घेतलेली रक्कम व कागदपत्रांचा वापर कुठे करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८६/२०२६ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी तातडीने पायधुनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

