स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल २१ वर्षांपासून पोलिसांना तसेच न्यायालयाला चकवा देत फरार असलेल्या आरोपीला खार पोलिसांच्या विशेष निगराणी व तडीपार पथकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ताब्यात घेतले. मुत्तू कृष्णन रामकृष्णन अरुणतुद्दी (वय ४२, रा. माहीम, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
सन २००५ मध्ये खार पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा क्रमांक २९/२००५ असून भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपी वारंवार गैरहजर राहत असल्याने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, नववे न्यायालय, बांद्रा (पूर्व), मुंबई यांनी त्याच्याविरुद्ध जाहीरनामा काढला होता. ४ ऑगस्ट २०२३ रोजी आरोपीविरुद्ध जाहीरनामा क्रमांक ११८५/२०२३ जारी करण्यात आला होता.
खार पोलिस ठाण्याचे विशेष निगराणी व तडीपार पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना आरोपीच्या शाहूनगर, माहीम येथील पत्त्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला असता संबंधित चाळ पाडण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे आरोपीबाबत ठोस माहिती मिळत नव्हती. त्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून चौकशी केली असता आरोपी आणि जमीनदार दोघेही मूळ गावी तमिळनाडू येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान, आरोपी रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. बुधवारी (९ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपी सीएसएमटी येथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अटकेबाबतची कायदेशीर माहिती आरोपीच्या आईला देण्यात आली असून, पुढील आदेशासाठी आरोपीला संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
ही कारवाई खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष निगराणी व तडीपार पथकातील पोलिस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलिस हवालदार गुरव, पोलिस हवालदार पोफळे आणि पोलिस शिपाई ठोंबरे यांनी केली.

