स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने अंधेरी पश्चिम परिसरात कारवाई करत मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून १५३.६ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ४ लाख ६० हजार ८०० रुपये आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ७ सप्टेंबर रोजी अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला रोडवरील मानो बीना अपार्टमेंट बसस्टॉपजवळ, वेस्ट १० कन्स्ट्रक्शनसमोर सापळा रचण्यात आला. यावेळी एमडी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या मोहम्मद जमीर अब्दुल अझीज खान (वय ३६, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५३.६ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.
या प्रकरणी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले (श्रीनगी) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.

