मुंबई प्रतिनिधी
मुंबई : पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावरून मुंबईतील एका रहिवाशाला व्हॉट्सॲपद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर विभागाने (सीआययू) वांद्रे येथील ४५ वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. मोहम्मद शरीफ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे.
वांद्रे परिसरातील रेल्वेच्या जमिनीवर उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक वास्तू पाडल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. या कारवाईचे कौतुक करणारी फेसबुक पोस्ट मुंबईतील एका रहिवाशाने केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला व्हॉट्सॲपवरून वारंवार धमकीचे कॉल तसेच व्हॉइस नोट्स पाठविण्यात आल्या. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी धमकीचे कॉल आणि संदेश ज्या मोबाईल क्रमांकावरून आले, त्याचा तांत्रिक तपास सुरू केला. प्राथमिक तपासात हा क्रमांक पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित पाकिस्तानी क्रमांक तसेच त्याच्या संपर्कातील इतर क्रमांकांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात आले. त्यावेळी पाकिस्तानी क्रमांकाच्या सातत्याने संपर्कात असलेला एक भारतीय मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला.
या भारतीय क्रमांकाचे टॉवर लोकेशन आणि मालकीची माहिती तपासल्यानंतर तो वांद्रे येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद शरीफ याचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी शरीफला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या मोबाईलमधून मिळालेल्या प्राथमिक डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्याची संशयित भूमिका स्पष्ट झाल्यानंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली.
शरीफकडून काही संशयास्पद सिमकार्डही जप्त करण्यात आली आहेत. ही सिमकार्ड कोणाच्या नावावर जारी करण्यात आली होती, ती कुठे आणि कशा पद्धतीने सक्रिय करण्यात आली तसेच त्यांचा कोणाशी संपर्क साधण्यासाठी वापर झाला, याचा तपास सुरू आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीसाठी शरीफ नेमके कोणत्या स्वरूपात काम करत होता, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, तपासात शरीफचे वडील पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) राहत असल्याची माहिती समोर आली आहे. शरीफचा वडिलांशी सातत्याने संपर्क असल्याचेही पोलिसांच्या तपासात आढळून आले. या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या स्वरूपाचे संभाषण होत होते आणि त्याचा धमकीच्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास अधिकारी करीत आहेत. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १९६(१), ३५१(४) आणि ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

