सातारा प्रतिनिधी
‘कोणाशी चॅटिंग करतोस?’ असा जाब विचारल्याच्या रागातून तरुणाला मारहाण करून सुरीने वार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा शहरातील देवी कॉलनी येथे घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अय्याज रियाज शेख (वय २६, रा. कामाठीपुरा, सातारा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार रहीम शेख आणि जरिना शेख (दोघेही रा. देवी कॉलनी, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास अय्याज शेख हे देवी कॉलनी येथील रहीम शेख यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अय्याज यांनी ‘तू असे का करतोस? कोणाशी चॅटिंग करतोस?’ अशी विचारणा केली. या कारणावरून संतापलेल्या रहीमने अय्याज यांच्या अंगावर धावून जात हाताने मारहाण केली.
दरम्यान, जरिना शेख हिने अय्याज यांना भिंतीवर जोरात ढकलले. त्यानंतर रहीम स्वयंपाकघरातून सुरी घेऊन अय्याज यांच्या अंगावर धावून आला. सुरीचा वार अडविण्याचा प्रयत्न करताना ती अय्याज यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याशेजारील बोटाला लागल्याने ते जखमी झाले. यानंतर दोघांनी अय्याज यांना शिवीगाळ करून ‘तुला सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बोराटे करीत आहेत.

