रणजित मस्के, गुन्हे वार्ताहर
बीड : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बीड पोलिसांनी दोन पीडित महिलांना चोरीस गेलेले त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने परत करून आगळीवेगळी सामाजिक बांधिलकी जपली. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे भाव उमटले. चोरीच्या घटनांचा तपास करून हस्तगत केलेली सुमारे ३ लाख ६६ हजार २६५ रुपयांची मालमत्ता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित महिलांच्या स्वाधीन करण्यात आली.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर चोरीस गेलेले दागिने महिलांना परत मिळाल्यास हा त्यांच्यासाठी भावनिक आनंदाचा क्षण ठरेल, या उद्देशाने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चोरीच्या गुन्ह्यांचा तत्परतेने तपास करून हस्तगत मालमत्ता संबंधितांना परत देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अलीकडील चोरीच्या घटनांचा तपास करून दागिने हस्तगत केले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते दोन पीडित महिलांना त्यांचे दागिने परत करण्यात आले. पहिल्या घटनेत बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील एका राहत्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी ३ लाख ३७ हजार २८० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले.
दुसऱ्या घटनेत परळी येथील आरती दीपक अरबुने या महिला बीड बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील २८ हजार ९८५ रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी तत्पर कारवाई करून आरोपीला अटक केली आणि चोरीस गेलेले मिनी गंठण हस्तगत केले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही महिलांना त्यांचे दागिने परत करण्यात आले.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आपल्या कष्टाच्या पैशातून घेतलेले दागिने पुन्हा मिळाल्याने दोन्ही महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि बीड पोलिसांचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीलतकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कामगिरीत पोलीस अंमलदार विलास कांदे, राजाभाऊ जाधव, महिला पोलीस अंमलदार सीमा गायकवाड, रामलीला गुंजाळ, शिवा घोलप आणि ज्ञानेश्वर मराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना परत मिळवून देण्यासाठी बीड पोलिसांचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

