स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : अमली पदार्थांच्या प्रकरणात फरार असलेल्या मॉडेल तथा अभिनेता रोहुल्लाह मेहदी याला काशिमीरा पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून अटक केली. दिल्लीहून मुंबईत येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संबंधित अमली पदार्थ प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहुल्लाह मेहदी याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असून, त्याचे कथितरित्या अमली पदार्थांच्या नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणेला होता. या प्रकरणात तो फरार झाल्यानंतर काशिमीरा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, तो दिल्लीहून मुंबईला येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी विमानतळ परिसरात सापळा रचला. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. मेहदी मुंबई विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याची चौकशी सुरू असून, या चौकशीतून अमली पदार्थांचा पुरवठा करणारे तसेच या नेटवर्कशी संबंधित अन्य व्यक्तींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई डीसीपी झोन-१ राहुल चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलिसांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.
चंदगडमध्ये एमडी निर्मितीच्या कारखान्यावर धाड
दरम्यान, महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पुणे पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कथित कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एमडी निर्मितीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य आणि रसायने जप्त करण्यात आली आहेत.
कारवाईदरम्यान कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर, ड्रिलसदृश मशीन तसेच अन्य साहित्य पोलिसांच्या हाती लागले. या कारखान्याच्या माध्यमातून अमली पदार्थ निर्मिती आणि पुरवठ्याचे जाळे किती दूरपर्यंत विस्तारले आहे, याचा तपास आता यंत्रणांकडून केला जात आहे.

