बारामती प्रतिनिधी
बारामती : आईसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर रात्री घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. मृत मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतरे यांची मुलगी असल्याची प्राथमिक माहिती आहे. रुई परिसरातील साईनगर भागात तिचा मृतदेह आढळून आला असून, अंगावर जखमांच्या खुणा असल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री मुलीचे आईसोबत काही कारणावरून किरकोळ भांडण झाले. त्यानंतर ती घराबाहेर पडली. बराच वेळ उलटूनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
मुलगी राहत्या घरासमोरील एका इमारतीच्या परिसरात गेली होती. संबंधित इमारतीच्या टेरेसचा दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर इमारतीच्या कंपाउंडच्या बाहेरील बाजूस सुमारे १० ते १५ फूट अंतरावर तिचा मृतदेह आढळला. त्यामुळे मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मृत मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या असून, तिचा इमारतीवरून पडून अपघाती मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली, अथवा अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांकडून या सर्व शक्यतांचा विचार करून तपास केला जात आहे.
दरम्यान, मृत्यूची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. तसेच पोलिसांशीही चर्चा केल्याचे समजते.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बारामती शहर पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

