भिवंडी प्रतिनिधी
भिवंडी : रस्त्याच्या कडेला उभे राहून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर नको त्या कमेंट्स करणाऱ्या तरुणांना जाब विचारणे ६५ वर्षीय रिक्षाचालकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली. ठाणा रोड परिसरातील समदनगर येथे झालेल्या वादानंतर तरुणांच्या मारहाणीत जमील अहमद मोमीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समदनगर परिसरात रस्त्याच्या कडेला काही तरुण उभे राहून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कमेंट्स करीत होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रिक्षाचालक जमील अहमद मोमीन (वय ६५) यांनी संबंधित तरुणांकडे जाऊन त्यांना जाब विचारला. मात्र, याच कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
या हाणामारीदरम्यान जमील मोमीन यांना गंभीर मारहाण झाल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे ठाणा रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

