
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
भिवंडी – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात सोमवारी रात्री उशिरा राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी रक्तरंजित घटना घडली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (४२) आणि त्याचा चुलत भाऊ तेजस तांगडी (२२) यांची काही मुखवटाधारी हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून तलवार आणि चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली.
खारबाव-चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे असलेल्या ‘जे डी टी इंटरप्रायसेस’ या कार्यालयात रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी थेट प्रवेश करत तांगडी बंधूंवर कहर केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या दोघांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले, तरी हा हल्ला ‘टार्गेट किलिंग’ असल्याची चर्चा रंगत आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु असून, भिवंडीच्या राजकीय पाटलिपुत्रात तांगडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.