छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर अंगावर शहारे आणणारी घटना घडली. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगराच्या कड्यावर गेलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी कुटुंबीयांसह पोलीस आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. माजी सरपंचांनी त्याला आयफोन १५ प्रो देण्याचे आमिष दाखवून खाली येण्याची विनंती केली. मात्र, कोणतीही आशा उरलेली नसल्याचे सांगत तरुणाने दरीत उडी घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल जाऊन ते खाली कोसळले. डोळ्यांदेखत मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचा धक्का सहन न झाल्याने आईनेही डोंगरावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये कुणाल चांदगुडे (१९), त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे (४२) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल सकाळी सुमारे १० वाजल्यापासून डोंगराच्या कड्यावर उभा राहून वारंवार जागा बदलत होता. त्याला खाली आणण्यासाठी पोलीस, ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी प्रयत्न सुरू केले होते.
तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनीही कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला खाली येण्यासाठी विनंती करताना, ‘तुला आयफोन १५ प्रो हवा असेल तर मी आणून देतो, मात्र तू खाली ये,’ असे सांगितले. मात्र, निराश झालेल्या कुणालने ‘आता कोणत्याही गोष्टीवर काहीच सोल्यूशन उरलेले नाही, हेच एकमेव सोल्यूशन आहे,’ असे सांगत आत्महत्येचा निर्णय कायम ठेवला.
दरम्यान, जवळपास तीन तास कुणालची आई रडत त्याची मनधरणी करत होती. त्यानंतर वडील धीर करून डोंगराच्या कड्यावर गेले. कुणाल बोलण्यात गुंतलेला असताना त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न मुरलीधर यांनी केला. मात्र, त्याचवेळी कुणालने दरीत उडी घेतली. मुलाला पकडण्याच्या प्रयत्नात मुरलीधर यांचाही तोल गेला आणि दोघेही खाली कोसळले.
यानंतर आपल्या डोळ्यांदेखत मुलगा आणि पती दरीत कोसळल्याने संगीता यांना मोठा धक्का बसला. त्यातून त्यांनीही डोंगरावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना वाचवण्यासाठी दरीत जाळी लावली होती. मात्र, कुणाल वारंवार जागा बदलत असल्याने बचावकार्याला अडथळा निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
खवड्या डोंगर परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्याचे सांगितले जात असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

