छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या विकासासह दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठवाड्याला भविष्यात दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पिढीने दुष्काळ अनुभवू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
LIVE | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण व हुतात्म्यांना अभिवादन
🕘 स. ९.१३ वा | १७-९-२०२६📍छत्रपती संभाजीनगर#Maharashtra #MarathwadaMuktiSangram #ChhatrapatiSambhajiNagarhttps://t.co/s5PE1oeLGn
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2026
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्ती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम सुरू होता आणि त्यानंतर झालेल्या संघर्षातून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा प्रदेश स्वतंत्र भारताचा भाग झाला, असे त्यांनी सांगितले.
त्या काळातील परिस्थितीचा उल्लेख करताना फडणवीस यांनी मराठी भाषा आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीवर असलेल्या निर्बंधांचाही उल्लेख केला. सण-उत्सव साजरे करण्यापासून ते मराठी भाषेच्या वापरापर्यंत अनेक प्रकारचे निर्बंध होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्यसैनिकांनी संघर्ष करत मराठवाड्याच्या मुक्तीसाठी योगदान दिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मराठवाड्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. मात्र, संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबरनंतर वेगाने पूर्ण करून मदत देण्याची कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्राकडून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांनुसार मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आधीपासूनच उपाययोजना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैरण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून चाऱ्याची लागवड करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या वीजबिलाबाबतही फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या निर्णयासोबतच त्यांच्या जुन्या थकीत वीजबिलांबाबत सरकारने निर्णय घेतला असून सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे थकीत वीजबिलांचा भार शेतकऱ्यांवर राहणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी सरकारकडून विविध प्रकल्पांवर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. उल्हास खोऱ्यातील सुमारे ७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या योजनेचा त्यांनी उल्लेख केला. हे काम टप्प्याटप्प्याने पुढे नेण्याचा प्रयत्न असून, सुमारे सात वर्षांच्या कालावधीत त्याची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पाण्याची उपलब्धता वाढवणे, सिंचनाचा विस्तार करणे आणि दुष्काळी परिस्थितीचा परिणाम कमी करणे या माध्यमातून मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “या पिढीने दुष्काळ पाहिला आहे; पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

