स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा कक्ष-८ ने अवघ्या २४ तासांत यशस्वी छडा लावला आहे. मानवी आणि तांत्रिक कौशल्याचा अचूक वापर करत पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणीला बेड्या ठोकल्या असून, तिच्याकडून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कॅनव्ही वोनवेंचर फर्नांडिस (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
वाकोला पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ९३९/२०२६ अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष-८ कडून सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून संशयित महिलेचा माग काढला. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तिला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोन पंच आणि महिला पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत तिची अंगझडती घेण्यात आली, ज्यामध्ये घरातील चोरीस गेलेले सर्व दागिने आणि ऐवज जप्त करण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत अंदाजे ५ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, २० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे नेकलेस, चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, दोन जोड चांदीचे पैंजण, चांदीचा हातातील कडा, ३,५०० रुपये रोख रक्कम आणि पासपोर्टचा समावेश आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर जप्त केलेल्या मुद्द्यामालासहित तिला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाकोला पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कवळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन बगाडे, महिला पोलीस उपनिरीक्षक भावना साळगावकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक दराडे आणि पोलीस उपनिरीक्षक हेमंत मिरजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस हवालदार सोनवणे, बारहाते, अमोल पाटील, महिला पोलीस हवालदार निलम मोरे, महिला पोलीस शिपाई शुभांगी जाधव व पथकातील अन्य पोलीस अंमलदारांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.

