मुंबई प्रतिनिधी
मुंबई : खार परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या गोण्यांखाली मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. मृत व्यक्तीचा १७ वर्षीय पुतण्यानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याने काकीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून काकाची हत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. विशेष म्हणजे, खुनानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी स्वतः तक्रारदाराच्या भूमिकेत वावरत होता.
खार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकामाच्या ठिकाणी १८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती सिमेंटच्या गोण्यांखाली बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच खार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृताची ओळख रविशंकर नंदकिशोर गिरी (३५) अशी झाली. तो बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असून बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.
प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने रविशंकर यांची हत्या करून मृतदेह बांधकाम साहित्याखाली लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर खार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, बांधकाम साईटवरील मजुरांकडून मिळालेली माहिती आणि घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली. याचदरम्यान मृताचा १७ वर्षीय पुतण्या स्वतः तक्रारदाराच्या भूमिकेत राहून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय तपास पथकाला आला.
त्याच्या जबाबातील विसंगती, घटनाक्रमाबाबतची माहिती, हालचाली आणि देहबोली यांची पोलिसांनी बारकाईने पडताळणी केली. त्यानंतर केलेल्या चौकशीत आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा संशय अधिक बळावला. अखेर मृताचा पुतण्या विशालकुमार रामलखन गिरी हाच हत्येतील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
काकीसोबतच्या प्रेमसंबंधातून हत्या?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीचे त्याच्या काकीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाला काकाचा विरोध असल्याने त्यांच्यात वाद होत होते. याच कारणातून आरोपीने काकाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्येनंतर मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवून आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

