नेरूळ प्रतिनिधी
नवी मुंबईतील पाम बीच रोडवर ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ वादातून संतापजनक आणि थरारक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ओला कार चालविणाऱ्या प्रवीण पांडे यांच्यावर एका अज्ञात कारचालकाने लोखंडी रॉडने हल्ला केल्यानंतर त्यांना तब्बल दोन किलोमीटर गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये रक्तबंबाळ अवस्थेतील प्रवीण पांडे मदतीसाठी आर्त हाक मारताना दिसत आहेत.
सिर फाड़ा.. फिर बोनट पर 2 km घसीटा !
नवी मुंबई के नेरुल में ओला ड्राइवर पर हमला करके उसे 2 km तक बोनट पर घसीटा गया… पाम बीच रोड पर ओवरटेक करने को लेकर हुई बहस के बाद रोड रेज की घटना हुई…आरोप है कि एक अनजान कार ड्राइवर ने ओला ड्राइवर प्रवीण पांडे के सिर पर लोहे की रॉड से… pic.twitter.com/QMWFBrp4ra
— UJJWAL DOBHAL (@UjjwalDobhal) August 19, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा पाम बीच रोडवर प्रवीण पांडे हे ओला कार घेऊन जात होते. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा एका अज्ञात कारचालकाशी वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूप काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात झाले.
वाद वाढल्यानंतर संबंधित कारचालकाने लोखंडी रॉडने प्रवीण यांच्या डोक्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. हल्ल्यानंतर आरोपीने तेथून कार घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला.
मात्र, प्रवीण यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारचालकाने वाहन थांबविण्याऐवजी कारचा वेग वाढवला. त्यामुळे प्रवीण कारच्या बोनेटवर फेकले गेले. भरधाव कार सुरू असताना जीव वाचविण्यासाठी त्यांनी गाडीच्या वायपरला घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर कारचालकाने त्यांना जवळपास दोन किलोमीटरपर्यंत बोनेटवरून फरफटत नेल्याचा आरोप आहे.
‘बचा लो मुझे…’ रक्तबंबाळ अवस्थेत आर्त हाक
या संपूर्ण प्रकारादरम्यान प्रवीण पांडे मदतीसाठी आरडाओरड करत होते. मात्र, कारचालकाने वाहन थांबवले नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अखेर काही अंतरावर आरोपीने प्रवीण यांना रस्त्याच्या कडेला सोडून कारसह पळ काढला.
या घटनेचे गांभीर्य वाढवणारी बाब म्हणजे प्रवीण यांनी या अवस्थेतही आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर रक्त दिसत असून, ते मदतीसाठी विनवणी करताना दिसत आहेत. ‘बचा लो मुझे, बचा लो मुझे’, अशी आर्त हाक ते वारंवार मारताना ऐकू येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नेरूळ पोलिसांकडे तक्रार; पहाटे गुन्हा दाखल
घटनेनंतर प्रवीण पांडे यांनी नेरूळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही पक्षांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
अखेर रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. संबंधित अज्ञात कारचालकाचा शोध सुरू असून, पाम बीच रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे तपास केला जात आहे.
ओव्हरटेकसारख्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद एका चालकाच्या जीवावर बेतण्याची वेळ येण्यापर्यंत पोहोचल्याने या घटनेने नवी मुंबईतील वाहतूक शिस्त आणि रस्त्यावरील वाढत्या हिंसक वर्तनाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

