स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : कफ परेड येथील आर्मी कॅम्पसमधील घरातून सात महिन्यांपूर्वी चोरीला गेलेले १६ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, परकीय चलन आणि भारतीय रोकड असा तब्बल १६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल कफ परेड पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी सपना संजय सिंग (३७) हिला पोलिसांनी अटक केली आहे.

सविता राजीव द्विवेदी या जानेवारी महिन्यात कुटुंबासह दोन महिन्यांसाठी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने, परकीय चलन आणि भारतीय रोकड चोरीला गेली होती. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर यांच्याकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी सलग पाच दिवस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.
तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी सपना संजय सिंग हिला जेकब हाऊस बिल्डिंग, नोफरा, कफ परेड येथून ताब्यात घेतले. चौकशीनंतर तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामुळे सात महिन्यांपूर्वी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१, सहाय्यक पोलीस आयुक्त, कुलाबा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड आणि पोलीस निरीक्षक अनंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस हवालदार संतोष पाटील, शेखर फड, सचिन खामकर तसेच पोलीस शिपाई विलास जाधव आणि कुमार पाथरूट यांच्या पथकाने ही कारवाई केली.

