स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : भायखळा परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणाला भायखळा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. आझाद मेहताब शेख (वय १९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६.९८ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १३ हजार ९६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत जिनाबाई मुळजी राठोड मार्ग परिसरात एक तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन आव्हाड आणि त्यांच्या पथकाने तेथे सापळा रचला. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजण्याच्या सुमारास काकळीज चौकाकडून जिनाबाई मुळजी राठोड मार्गाने एकतानगरच्या दिशेने जाणारा संशयित तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव आझाद मेहताब शेख असल्याचे सांगितले.
दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांना माहिती देऊन दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे १४० रुपये रोख आणि पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. तपासणी केल्यानंतर ती मॅफेड्रोन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ६.९८ ग्रॅम एमडी प्लास्टिकच्या पिशवीसह जप्त केले.
याप्रकरणी भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०४/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला १६ ऑगस्ट रोजी रात्री ८.५० वाजता अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन आव्हाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास भायखळा पोलिस करीत आहेत.

