स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबईतील पायधुनी परिसरात विश्वासाचा खून करत तब्बल १ कोटी २० लाख रुपयांच्या रोकडचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कार्यालयातील पैशांची बॅग बदलून रोकड लांबवणाऱ्या एका आरोपीला पायधुनी पोलिसांनी राजस्थानातून बेड्या ठोकल्या आहेत, तर त्याच्याकडून तब्बल १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादीने आरोपी पीरसिंग वसंत सिंग देवडा (३०) याच्यावर विश्वास ठेवून १ कोटी २० लाख रुपये आणण्याची जबाबदारी सोपवली होती. दोन वेगवेगळ्या बॅगांमध्ये ही रोकड देण्यात आली होती. मात्र, पीरसिंगने हुशारीने पैशांच्या बॅगा बदलून त्याजागी कागदी बंडलांची बनावट बॅग फिर्यादीच्या स्वाधीन केली आणि तो रोकड घेऊन फरार झाला.
या प्रकारानंतर १० ऑगस्ट रोजी पायधुनी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पायधुनी पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबईपासून थेट अहमदाबादपर्यंतचा माग काढला. तपासात मुख्य आरोपी पीरसिंग देवडा याने त्याचा भाऊ युवराज सिंग देवडा (२४) याच्यासोबत संगनमत करून हा प्लॅन रचल्याचे स्पष्ट झाले.
माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने राजस्थानात धाव घेत १४ ऑगस्ट रोजी सिरोही जिल्ह्यातील मामावली गावातून युवराज सिंग देवडा याला अटक केली. त्याच्या ताब्यातून अपहारातील १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात यश आले आहे. उर्वरित रकमेचा शोध आणि मुख्य आरोपी पीरसिंग देवडा याचा कसून शोध पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त रागसुधा आर. आणि सहाय्यक आयुक्त रेणुका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, निरीक्षक अजय कदम, तपासी अधिकारी सचिन लहामगे व पथकाने ही धडक कारवाई पार पाडली आहे.

