सातारा प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या मानाच्या पोलीस सेवा पदकांमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. जिल्ह्यातील तब्बल २६ पोलीस अधिकारी व अंमलदारांची त्यांच्या दीर्घकालीन, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवेसाठी सेवा पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये १० जणांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’, तर १६ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेपासून कायदा-सुव्यवस्था राखण्यापर्यंत तसेच विविध आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावताना केलेल्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील २६ अधिकारी-अंमलदारांना हा बहुमान मिळाल्याने सातारा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२५ वर्षांच्या सेवेला ‘अतिउत्कृष्ट’चा मान
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निकषांनुसार दीर्घकाळ निष्कलंक सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा पदकांनी गौरविण्यात येते. २५ वर्षांची उल्लेखनीय आणि निष्कलंक सेवा पूर्ण करणाऱ्यांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’, तर १५ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान केले जाते.
‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’प्राप्त
सातारा जिल्ह्यातील १० अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंदे (एम.टी. विभाग), पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे (कराड शहर), राखीव पीएसआय सुशील कदम, श्रेणी पीएसआय सतीश सुभे, श्रेणी पीएसआय तानाजी माने (वाहतूक शाखा), सहायक पीएसआय राजू मुलाणी, एएसआय तेजपाल शिंदे (विशेष शाखा), एएसआय सावता राऊत (नियंत्रण कक्ष), अविनाश डेरे (भुईंज) आणि पोलीस हवालदार मोहन नाचण (स्थानिक गुन्हे शाखा) यांचा समावेश आहे.
१६ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’
तर १६ अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, एपीआय सुशील भोसले (वाठार), एपीआय सुदर्शन काटकर (सातारा तालुका), पीएसआय रऊफ इनामदार (आर्थिक गुन्हे शाखा) यांच्यासह पोलीस हवालदार मधुकर कुंभार, मंजूर मणेर, राजकुमार ननावरे, श्रीनिवास देशमुख, रोहित तोरस्कर, अमित माने, गणेश कापरे, संदीप दौंड, प्रवीण पोळ, मधुकर भिसे, नीलेश दयाळ आणि महिला पोलीस हवालदार मंगल कांबळे यांचा समावेश आहे.
सातारा पोलीस दलाची कामगिरी अधोरेखित
सातारा जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, विविध प्रकारची कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने, गुन्हेगारीविरोधातील कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्याने कर्तव्य बजावावे लागते. अशा परिस्थितीत अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने सेवा बजावलेल्या अधिकारी-अंमलदारांच्या कामाची केंद्र सरकारने घेतलेली दखल ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
एकाच वेळी २६ अधिकारी-अंमलदारांना सेवा पदके जाहीर झाल्याने सातारा पोलीस दलातील दीर्घकालीन आणि गुणवत्तापूर्ण सेवेचा गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सर्व पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या पुढील सेवेसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर जाहीर झालेला हा सन्मान केवळ पदकप्राप्त अधिकारी-अंमलदारांसाठीच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्हा पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

