सातारा प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी सातारा शहर पोलिस आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महत्त्वाचे नियोजन केले आहे. गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुकांसाठी २९ व ३० ऑगस्ट तसेच ८, ९ आणि ११ सप्टेंबर असे पाच दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गणेश मंडळांना मिरवणुकीचे नियोजन करता येणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात पोलिस प्रशासन आणि सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. अलीकडच्या काळात गणेश विसर्जनाप्रमाणेच आगमन मिरवणुकांचे स्वरूपही मोठे झाले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगमनासाठी पाच दिवस निश्चित करण्यात आले.
‘एक खिडकी’ योजनेला सकारात्मक प्रतिसाद
गणेश मंडळांना विविध परवानग्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबविण्याची मागणी समितीने प्रशासनाकडे केली आहे. या मागणीला पोलिस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत आगमन मिरवणुकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या पाच दिवसांमध्येच विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन मंडळांच्या अडचणी मांडल्या.
१२ आणि १३ सप्टेंबरला मिरवणुका नकोत
दरम्यान, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळाने आगमन मिरवणूक काढू नये, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सणाची खरेदी करता यावी, स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू राहावा आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे.
ध्वनिक्षेपकाच्या नियमांचे पालन करा
गणेशोत्सव काळात सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिक्षेपकासंदर्भातील निर्देशांचे काटेकोर पालन करावे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी केले.
बैठकीस अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम शेवाळे, समन्वय समितीचे अध्यक्ष महेश साळुंखे, उपाध्यक्ष अभिजित बारटक्के, सचिव अक्षय गवळी, नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांच्यासह चंद्रशेखर घोडके, विजय भोसले, सुजित परदेशी, मुन्ना बागवान, ऋषिकेश डांबे, पप्पू इंगवले आदी उपस्थित होते.
नियोजनबद्ध आगमन, वाहतूक कोंडीला आळा आणि कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य, या त्रिसूत्रीवर यंदाचा साताऱ्यातील गणेशोत्सव पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.

