विटा प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ ते २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, विट्याहून आटपाडी घाटाच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि विजापूरहून मेढा (जि. सातारा)कडे जाणारी एसटी बस रेणावी घाटातील तीव्र वळणावर समोरासमोर आल्या. वळणावर दोन्ही बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले.
स्थानिकांची धाव; जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले
अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. काही प्रवाशांना बसमधून बाहेर काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
घाटातील वाहतूक विस्कळीत
या भीषण अपघातामुळे रेणावी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रस्त्यावर दोन्ही बस आडव्या झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त बस बाजूला करण्याचे काम हाती घेतले.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करीत आहेत. घाटातील तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला की, अतिवेग अथवा वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना घडली, याचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेमुळे सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

