कल्याण प्रतिनिधी
कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरातील संदीप हॉटेलजवळ रविवारी भटक्या कुत्र्याने १५० हून अधिक जणांना चावा घेतल्याची माहिती देण्यात आली होती. ही माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डॉक्टरांकडूनच प्रसारमाध्यमांना देण्यात आली होती. मात्र, रुग्णांबाबत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पगारे यांना केडीएमसीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
माहितीची खातरजमा न करताच प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याने महापालिका प्रशासनावर टीका झाली, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. महापालिकेशी संबंधित अधिकृत माहिती देताना विभागप्रमुख, आयुक्त किंवा जनसंपर्क विभागामार्फतच माहिती देणे अपेक्षित असताना डॉ. पगारे यांनी वरिष्ठांना विश्वासात न घेता माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी डॉ. पगारे यांना २४ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी ही नोटीस बजावली आहे.

