मुंबई प्रतिनिधी
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या कारकीर्दीला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 14 ऑगस्ट रोजी मुंबईत त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशतर्फे आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा सायंकाळी 5 वाजता यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सत्कार सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून दहा वर्षांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय, अनुसूचित जाती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यास रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

