सांगली प्रतिनिधी
सांगली : मध्यरात्री ड्यूटी संपल्यानंतर भूक लागल्याने नाश्ता मिळतो का, हे पाहण्यासाठी सहकारी डॉक्टरांसोबत दुचाकीवरून बाहेर पडलेल्या २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचा विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत सहकारी डॉक्टर जखमी झाले असून, विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत डॉक्टर तरुणीचे नाव डॉ. खुशी पवन मुंदडा (वय २४, मूळ नागपूर) असे आहे. तर डॉ. योगेश संतोष लढ्ढा (वय २७, मूळ वाशिम) हे जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्रीनंतर सुमारे पावणेदोनच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. खुशी मुंदडा यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. सध्या त्या सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. ड्यूटी संपल्यानंतर भूक लागल्याने त्यांनी सहकारी निवासी डॉक्टर डॉ. योगेश लढ्ढा यांना नाश्ता मिळणाऱ्या ठिकाणाबाबत विचारणा केली. त्यानंतर दोघे डॉ. खुशी यांच्या दुचाकीवरून नाश्त्याच्या शोधात बाहेर पडले. दुचाकी डॉ. लढ्ढा चालवत होते.
विश्रामबाग चौक परिसरात नाश्ता न मिळाल्याने ते लक्ष्मी मंदिराच्या दिशेने निघाले. त्यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर जखमी डॉ. खुशी मुंदडा यांना संबंधित चारचाकीतून भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉ. योगेश लढ्ढा यांच्या चेहऱ्याला आणि उजव्या खांद्याला दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निवास कांबळे करत आहेत.

