नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार : कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यरात्री अटक केली. अटकेनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेल्या काही कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणात माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या नातेवाईक रोहन गावित यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विजय चौधरी यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, संबंधित कथित ऑडिओ क्लिप्समध्ये डॉ. हिना गावित आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह तसेच जातिवाचक भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून अखेर विजय चौधरी यांना अटक केली.
दरम्यान, विजय चौधरी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट तयार करण्यात आल्या असून, स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे राजकीय षड्यंत्र रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

