छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)च्या आंदोलनानंतर राज्यभर विविध ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या ‘जेन-झी’ तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी गुरुवारी दिली. तरुणांना समजून घेत संवादातून प्रश्न सोडविण्यावर पोलिसांचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या दाते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याशी पोलीस मे महिन्यापासून सातत्याने संपर्कात आहेत. ते अमेरिकेत असतानाही त्यांच्याशी संवाद सुरू होता. दीपके यांनी आपल्या आई-वडिलांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांशीही पोलीस संपर्कात आहेत.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर राज्यातील अनेक ठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले. या आंदोलनांदरम्यान संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असले, तरी ते मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दाते यांनी दिली.
“प्रत्येकाच्या घरात तरुण मुलं आहेत. विशिष्ट वयात काही गोष्टी घडत असतात. शेवटी ती आपलीच मुलं आहेत,” असे सांगत त्यांनी तरुणांशी सातत्याने संवाद ठेवण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अपघाती मृत्यू कमी करण्यावर भर
तरुणांमधील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस विभाग विविध उपाययोजना राबवत असल्याचे दाते यांनी सांगितले. आतापर्यंत अपघातातील मृत्यूंमध्ये ५४० ने घट झाली असली, तरी हा आकडा आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. एका तरुणाचा मृत्यू म्हणजे त्या कुटुंबासह समाजाचेही मोठे नुकसान असल्याचे त्यांनी नमूद केले.
१६ हजार पदांची भरती पूर्ण
राज्यात पोलीस विभागात सुमारे २२ हजार रिक्त पदे होती. त्यापैकी १६ हजार पदे भरली गेली असून उर्वरित बहुतांश पदे उपनिरीक्षकांची आहेत. या पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार असल्याचे दाते यांनी सांगितले. तसेच गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी तपासाची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पीएमओ सचिवांशी दूरचित्रसंवाद
गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान कार्यालयाच्या सचिवांसोबत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा दूरचित्रसंवाद झाला. या चर्चेदरम्यान ‘जेन-झी’ आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘सेव्ह लाईफ’ उपक्रमाचा विस्तार
अपघात रोखण्यासाठी सुरू असलेला ‘सेव्ह लाईफ’ फाऊंडेशनचा उपक्रम सध्या ११ जिल्ह्यांत राबविला जात असून, लवकरच त्याचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
सायबर पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले की, राज्यातील सायबर पोलीस ठाण्यांसाठी सुमारे ८५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या वाढविणे, हद्दवाढ, पोलीस वसाहती, व्यसनमुक्ती, मनुष्यबळ वाढ, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, शिक्षेचे प्रमाण वाढविणे आणि पती-पत्नी एकत्रिकरण यांसह विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

