सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून मतदान प्रतिनिधी नियुक्तीच्या ठरावांचा आज (बुधवार) अखेरचा दिवस असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. गावागावांतील सहकारी संस्थांमध्ये मतदान प्रतिनिधी कोणाच्या बाजूने जाणार, यावरून जोरदार राजकीय हालचाली सुरू असून अनेक ठिकाणी विद्यमान समीकरणांना धक्का बसत असल्याचे चित्र आहे. आज सादर होणाऱ्या ठरावांमुळे जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीचा प्राथमिक राजकीय कल स्पष्ट होणार असल्याने सर्वच गटांचे लक्ष या प्रक्रियेवर लागले आहे.
जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांकडून मतदान प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव सहायक निबंधक कार्यालयात सादर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, नागरी सहकारी पतसंस्था, विविध कृषी व इतर उत्पादन संस्था, औद्योगिक, मजूर, ग्राहक, पाणीपुरवठा तसेच इतर विविध सहकारी संस्थांचे बहुसंख्य ठराव दाखल झाले आहेत. उर्वरित संस्थांचे ठराव आज दिवसभरात सादर होणार असल्याने प्रशासनाकडेही हालचालींना वेग आला आहे.
ठराव प्रक्रियेदरम्यान अनेक गावांमध्ये बैठका, संपर्क मोहीम, राजकीय चर्चा आणि गटबाजीला उधाण आले आहे. मतदान प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी विविध राजकीय गटांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून काही संस्थांमध्ये एकमताने तर काही ठिकाणी तीव्र चुरशीने ठराव मंजूर होत आहेत. अनेक संस्थांमध्ये प्रतिनिधी निश्चितीवरून स्थानिक पातळीवर राजकीय संघर्ष उफाळून आला असून काही ठिकाणी वर्षानुवर्षे कायम असलेली समीकरणेही बदलताना दिसत आहेत.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणारी निवडणूक मानली जाते. त्यामुळे प्रत्येक मतदान प्रतिनिधीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठरावांच्या माध्यमातून कोणत्या गटाला किती पाठबळ मिळते, यावर पुढील उमेदवारी, पॅनेलची बांधणी आणि निवडणुकीची रणनीती अवलंबून राहणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्येही प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार मनोज घोरपडे आणि आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांकडून मतदान प्रतिनिधी आपल्या बाजूने वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे भाजपने या निवडणुकीची प्रमुख जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर सोपविल्याने त्यांच्या रणनीतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज ठराव सादर करण्याची मुदत संपल्यानंतर कोणत्या गटाकडे किती मतदान प्रतिनिधींचे संख्याबळ आहे, याचे प्राथमिक चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर उमेदवार निश्चिती, पॅनेल उभारणी आणि अंतिम राजकीय रणनीतीला वेग येणार असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, आजचा ठरावांचा शेवटचा दिवस अनेक नेत्यांच्या राजकीय ताकदीची पहिली कसोटी ठरणार आहे.


