मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप, अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवत असल्याने त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी रुग्णालय गाठल्याची माहिती समोर आली आहे.
गेले २-३ दिवस तब्येत साथ देत नसल्याने आणि याबाबत आज माध्यमांमधील बातम्या पाहून अनेक हितचिंतक फोन करतायत. आपल्या काळजीबद्दल धन्यवाद, पण काळजीचे काहीही कारण नाही. व्हायरल फ्लू किंवा इतर काही कारण आहे का, याबाबत तपासणी सुरू आहे. खरं तर डॉक्टरांनी आजार अंगावर न काढता सक्तीच्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2026
रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरे, पक्षाच्या बैठका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने व्यस्त होते. तब्येत बिघडूनही त्यांनी नियोजित कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला.
रुग्णालयात त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून पुढील उपचाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गरज भासल्यास काही अतिरिक्त चाचण्याही करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नसून, नियमित तपासणी आणि उपचारासाठीच त्यांना दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
रोहित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करत आहेत. शेतकरी, बेरोजगारी, शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. वाढत्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढल्याचेही बोलले जात आहे.
नुकतेच शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी हटविण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने कर्जमाफीच्या काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पेपरफुटी, रोजगार आणि शिक्षणाच्या प्रश्नांवरही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार रोहित पवार यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लवकरच नियमित राजकीय आणि सार्वजनिक कामकाजात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहितीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


