मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराजचे नेते प्रशांत किशोर यांनी भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला सर करत दणदणीत विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी प्रशांत किशोर यांचे अभिनंदन करताना हा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचा दावा केला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक 'डेडलाईन' असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे.… pic.twitter.com/8Dbl9OR0oG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2026
रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांनी जन सुराजचे प्रशांत किशोर यांना विजयी करून भाजपला मोठा धक्का दिला आहे. “प्रत्येक गोष्टीला एक डेडलाईन असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
“भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आता ‘अपना टाईम आएगा’ नव्हे, तर ‘अपना टाईम आ गया’… त्यामुळे थोडा धीर धरा, विजय आपलाच आहे,” असा उल्लेखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला.
डिलिमिटेशन विधेयकावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. दिल्लीतील जंतरमंतरवरील तरुणांचे आंदोलन आणि बांकीपूरमधील भाजपचा पराभव पाहता संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले. “जर हे विधेयक मंजूर झाले नाही, तर तो लोकशाहीचा विजय ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा १८ हजार ९५३ मतांनी पराभव केला. प्रशांत किशोर यांना ६३ हजार २०३, तर नीरज कुमार यांना ४४ हजार २५० मते मिळाली. राजदच्या उमेदवार रेखा गुप्ता या १४ हजार ८५ मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिल्या. गेली तीन दशके भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा पोटनिवडणुकीत जन सुराजच्या खात्यात गेल्याने बिहारच्या राजकारणात या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


