सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ठरावाने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. बहुमत असल्याचा दावा असतानाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला धक्का बसत ठराव सत्यजितसिंह पाटणकर गटाच्या बाजूने मंजूर झाला. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी घडलेल्या राजकीय घडामोडींचीच पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडे सोसायटीमध्ये देसाई गटाकडे आठ संचालकांचे संख्याबळ, तर पाटणकर गटाकडे चार संचालक होते. मात्र ठरावापूर्वी देसाई गटातील दोन संचालक पाटणकर गटाकडे गेल्याने दोन्ही गटांची ताकद सहा-सहा सदस्यांवर आली. मतदानावेळी दोन्ही बाजूंना समान मते मिळाल्यानंतर अध्यक्षांचे मत निर्णायक ठरले. अध्यक्षांनी पाटणकर गटाच्या बाजूने मतदान केल्याने ठराव त्यांच्या बाजूने मंजूर झाला.
या ठरावासाठी सोसायटी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच काही संचालकांना पोलिस संरक्षणात सभास्थळी आणण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे सहकार क्षेत्रातील राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
एकेकाळी (स्व.) यशवंतराव चव्हाण, आबासाहेब वीर, लोकनेते बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील-उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील आणि सदाशिव पोळ यांसारख्या नेत्यांनी राजकारणापेक्षा सहकाराला प्राधान्य देत सातारा जिल्हा बँकेची देशभर ओळख निर्माण केली होती. नाबार्डच्या अनेक पुरस्कारांनी गौरविलेल्या या बँकेच्या निवडणुकीत आता पोलिस बंदोबस्तात ठराव होत असल्याने ज्येष्ठ सहकार कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येही जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि अनेक नगरपालिकांनंतर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरही आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत पाटणमधील निवडे सोसायटीचा निकाल हा केवळ एका ठरावापुरता मर्यादित न राहता आगामी जिल्हा बँक निवडणुकीतील राजकीय समीकरणांचा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.


