स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यातून तिकिटे मिळवून देण्यासाठी लोकभवन कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या, बनावट शिक्के आणि खोटा मजकूर वापरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मलबार हिल पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गोपनीय माहिती जप्त करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०/२०२६ दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(२), ३३६(३), ३३६(४), ३३७, ३४०(२) आणि २०४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेश, गुजरात आणि मुंबई परिसरात आरोपींचा शोध घेत सहा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमरीश ईश्वरलाल ठक्कर (मुख्य सूत्रधार), तारीख मेहफूज खान, दीपककुमार कन्हैयालाल यादव, विनय विक्रमसिंग रावत, सागर ईश्वरलाल ठक्कर आणि क्षत्रुंजय रामकुमार यादव उर्फ अनुप उर्फ मोहन यांचा समावेश आहे.
तपासात मुख्य आरोपी अमरीश ठक्कर याच्याविरोधात यापूर्वी कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथेही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
आरोपींकडून १२ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, १६ सिम कार्ड, ७० क्रेडिट-डेबिट कार्ड, ४०० हून अधिक व्यक्तींच्या व्हीआयपी रेल्वे बुकिंगशी संबंधित गोपनीय डेटाबेस, २ बनावट शिक्के, ५ आधार कार्ड आणि २ स्टॅम्प पॅड असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या रॅकेटमधील इतर आरोपी आणि आर्थिक व्यवहारांचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (दक्षिण परिमंडळ-२) रागसुधा आर. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गावदेवी विभाग) सुमन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर गोरवे, पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अक्षय चौगुले, पोलीस हवालदार गुलाबखान पठाण, पोलीस हवालदार संतोष लोखंडे, पोलीस हवालदार राजेश सरवदे, पोलीस हवालदार रामेश्वर माचेवाड, पोलीस शिपाई सचिन चतुर, पोलीस शिपाई आशिष घोरपडे, पोलीस शिपाई सत्यवान राऊत, पोलीस शिपाई समीर भालेराव आणि पोलीस शिपाई जगदेव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


