मुंबई, प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरातील एका खासगी प्लॉटवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अंधेरी तालुका अध्यक्ष तथा टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित खासगी प्लॉटच्या मालकाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीत संजय खंडागळे यांनी त्यांचे सहकारी छोटा कन्ना, मोठा कन्ना तसेच इतर १० ते १५ महिला-पुरुषांसह प्लॉटवर जाऊन बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, संजय खंडागळे व त्यांच्या गटाकडून अंधेरी, मरोळ तसेच गोरेगावमधील आरे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून घरे व जागांवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप काही स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांकडून त्याबाबतही तपास सुरू आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संजय खंडागळे, छोटा कन्ना आणि मोठा कन्ना यांच्याविरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत नोंद आणि न्यायालयीन स्थितीची पडताळणी अद्याप सुरू आहे.
दरम्यान, घर, प्लॉट किंवा इतर मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तातडीने संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पवई पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


