स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) नावाने नागरिकांना खोटे मेसेज पाठवून आणि मोबाईलमध्ये बनावट APK फाईल डाऊनलोड करायला लावून देशभरात तब्बल ६३.६९ कोटी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा मुंबईच्या डॉ. डी.बी. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एस. के. मंडल (वय २६, रा. झारखंड) याला पोलिसांनी झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमेवर सिनेमी स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईमुळे सायबर विश्वात खळबळ उडाली असून, या रॅकेटचे धागेदोरे देशव्यापी असल्याचे समोर आले आहे.
असा उघड झाला प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मूळ तक्रारदाराला महानगर गॅसच्या नावाने एक मेसेज आला होता. बिल भरण्यासंदर्भात किंवा इतर कारणांचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी तक्रारदाराला मोबाईलमध्ये एक APK फाईल इन्स्टॉल करण्यास भाग पाडले. ही फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड होताच, हॅकर्सनी मोबाईलमधील बँकिंग आणि गोपनीय माहिती ट्रॅक करत तक्रारदाराच्या खात्यावरून ७०,५०० रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी डॉ. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांच्या हाती घबाड: १० मोबाईल, लॅपटॉप आणि ३७ हजारांहून अधिक जणांचा डेटा
पोलीस तपासात आरोपींचे मोठे जाळे उघड झाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून १० मोबाईल फोन, १ लॅपटॉप, ७ सिमकार्ड, ४ क्रेडिट/डेबिट कार्ड, ९६७ बनावट APK फाईल्स आणि तब्बल ३७,२०० नागरिकांचा बँकिंग गोपनीय माहिती असलेला डेटाबेस जप्त केला आहे.
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, या मुख्य आरोपीने स्वतः तयार केलेल्या ९१ बनावट APK फाईल्स इतर सायबर गुन्हेगारांना विकल्या होत्या. या बनावट फाईल्सच्या माध्यमातून देशभरात तब्बल २,९९३ नागरिकांची फसवणूक झाली असून, यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील ५१२ नागरिकांचा समावेश आहे. या सर्व फसवणुकीची एकूण रक्कम तब्बल ₹६३,६९,६८,१७४ इतकी प्रचंड आहे.
पोलिसांची धडक कारवाई
हा सायबर गुन्हा अत्यंत गुंतागुंतीचा होता, मात्र मुंबई पोलिसांच्या अचूक तांत्रिक तपासाने आरोपीला जेरबंद केले. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त रागसुधा आर. आणि सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली.
या पथकात डॉ. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन दळवी, पोलीस निरीक्षक युवराज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवेश पाटील, अभिजीत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक किरण देवरे, पोलीस हवालदार आनंद गावडे आणि पोलीस शिपाई दादासाहेब घोडके, आतिष वाघमारे व जगदेव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या टोळीतील इतर म्होरक्यांचा आणि साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत असून, या आंतरराज्यीय सायबर नेटवर्कचा आणखी मोठा पाडाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पोलिसांनी या निमित्ताने नागरिकांना कोणत्याही अज्ञात लिंक किंवा APK फाईल्स डाऊनलोड न करण्याचे आवाहन केले आहे.


