स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात झुल्फीकार बेहलीम टोळीवर मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-९ने धडक कारवाई केली आहे. या धडाकेबाज कारवाईत टोळीचा म्होरक्या झुल्फीकार बेहलीम आणि त्याचा भाऊ मोहसीन बेहलीम यांच्यासह एकूण १२ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, झुल्फीकार बेहलीम आणि मोहसीन बेहलीम यांनी आपल्या साथीदारांच्या बळावर एका बांधकाम व्यावसायिकाकडे सुरू असलेल्या कंत्राटी कामासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची गंभीर धमकीही देण्यात आली होती. या प्रकारामुळे संबंधित व्यावसायिक आणि परिसरातील इतर व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-९ने तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. २७ जुलै २०२६ रोजी वांद्रे परिसरात खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या मुख्य सूत्रधारांसह एकूण १२ आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात जेरबंद केले.
याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कसून तपासासाठी हा गुन्हा गुन्हे शाखा कक्ष-९ कडे वर्ग करण्यात आला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ३१ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात मुख्य आरोपी झुल्फीकार बेहलीम याच्यावर यापूर्वीही मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई झाल्याची माहिती समोर आली असून, सध्या तो जामिनावर बाहेर होता. या टोळीने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील इतरही व्यावसायिकांना अशाच प्रकारे धमकावून खंडणी उकळली आहे का, याचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दरम्यान, या टोळीच्या त्रासाला बळी पडलेल्या किंवा धमकावल्या गेलेल्या नागरिकांनी न घाबरता गुन्हे शाखा कक्ष-९ किंवा मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कारवाई करणारे अधिकारी आणि पोलीस पथक
ही धडाकेबाज कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखा कक्ष-९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, जयदीप जाधव, मोहन जगदाळे, विजय धोत्रे, श्रीराम घोडके, तसेच पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, ऋषिकेश बाबर, सुजित म्हैसधुणे व इतर अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.


