नागपूर प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमशान घातले असून, शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील काही तालुक्यांसह हिंगणा, कामठी तसेच शहरालगतच्या परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारनंतर नागपूर शहरात पावसाचा जोर अचानक वाढला. काही तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी घरांमध्ये आणि शाळांच्या परिसरातही पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसामुळे काही विद्यार्थी अडकून पडल्याच्या घटनाही समोर आल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात ये-जा करताना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, पावसाच्या काळात नदी, नाले आणि सखल भागांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
चंद्रपूरमध्येही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
दरम्यान, नागपूरपाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्टचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवास करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदी-नाले, पूल आणि सखल भागांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा वाढता जोर आणि हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि नागरिकांचे संरक्षण याला प्राधान्य देत प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.


