नवी दिल्ली : प्रतिनिधी
नीटसह विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा समाजमाध्यमावर व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करून तरुणांचे आभार मानले. गुरुवारी रात्री विद्यार्थ्यांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
PM Shri @narendramodi thanked India’s youth for the response and suggestions following his video and expressed his gratitude for the overwhelming support.
Watch ⬇️ pic.twitter.com/Y2q35aRNdP
— BJP (@BJP4India) July 24, 2026
‘काल रात्री तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. माझ्या व्हिडीओला दिलेले प्रेम, सकारात्मक प्रतिसाद आणि तुम्ही केलेल्या सूचनांबद्दल मी मनापासून आभारी आहे. तुमचे प्रेम असेच कायम राहावे आणि आपले नाते अधिक दृढ व्हावे, हीच अपेक्षा आहे,’ असे मोदी यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
यापूर्वी गुरुवारी रात्री मोदी यांनी ‘सेल्फी-स्टाईल’ व्हिडीओच्या माध्यमातून देशातील विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधला होता. नीटसह विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून, या समस्येवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
‘पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब असून, त्याचा फटका लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसतो. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांत पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारकडून अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत,’ असे मोदी यांनी सांगितले.
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्याबरोबरच फास्ट-ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे त्यांनी म्हटले होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील चर्चेनंतर या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाईल. तसेच संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात संबंधित विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये असंतोषाचे वातावरण असताना पंतप्रधान मोदी यांनी सलग दोन दिवस समाजमाध्यमांद्वारे संवाद साधल्याने या प्रकरणाला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.


