नवी दिल्ली वृत्तसंस्था
नीट पेपरफुटीप्रकरणी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी गुरुवारी मध्यरात्री अचानक उपोषण सोडले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषणाची सांगता केली. मात्र, उपोषण सोडल्यानंतर अवघ्या २४ तासांत वांगचूक यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनादरम्यान आपल्याला अक्षरशः कैद्याप्रमाणे डांबून ठेवण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे.
वांगचूक यांनी उपोषण सोडले असले तरी अभिषेक दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच आहे. दुसरीकडे, मागण्या मान्य होण्यापूर्वीच वांगचूक यांनी उपोषण सोडल्याने त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सरकारशी काही ‘डील’ झाल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतल्याचा आरोपही केला जात आहे. या आरोपांना वांगचूक यांनी आपल्या नव्या व्हिडीओद्वारे प्रत्युत्तर दिले.
‘मी २६ दिवस उपाशी राहिलो. या काळात माझे ११ किलो वजन कमी झाले. त्याचा शरीरातील अवयवांवर आणि मेंदूवर परिणाम होत आहे. त्यामुळे माझ्या उपोषणाच्या पवित्रतेचे प्रमाणपत्र मला कोणाकडूनही घेण्याची गरज नाही. जर मला सरकारशी डीलच करायची असती, तर मी २६ दिवस उपाशी का राहिलो असतो? एखाद्या वातानुकूलित खोलीत बसूनही डील करता आली असती. दिल्लीच्या कडाक्याच्या उष्णतेत २६ दिवस उपोषण करण्याची मला काय गरज होती?’ असा सवाल वांगचूक यांनी केला.
‘मला कैद्याप्रमाणे डांबून ठेवले’
आंदोलनस्थळावरून रुग्णालयात नेण्यात आल्यानंतरच्या परिस्थितीबाबतही वांगचूक यांनी गंभीर आरोप केले. ‘१८ तारखेला मला जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मला एका छावणीतून थेट जेलमध्ये नेल्यासारखे वाटले. एखाद्या कैद्यालाही कदाचित अशा पद्धतीने ठेवले नसेल. माझ्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले होते. मला बाहेर जाता येत नव्हते, कोणालाही भेटता येत नव्हते. माझ्या कुटुंबातील केवळ तीन व्यक्तींनाच भेटण्याची परवानगी होती. मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्याचीही मुभा नव्हती,’ असा दावा त्यांनी केला.
‘मी नॅपकीनवरून संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत होतो; मात्र ते संदेशही जप्त केले जात होते. ही परिस्थिती म्हणजे जणू काही नॉर्थ कोरियासारखीच होती,’ अशी टीका वांगचूक यांनी केली.
‘मला सर्वांच्या उपस्थितीत उपोषण सोडायचे होते’
आपल्याला उपोषण सोडायचे नव्हते, असा खुलासाही वांगचूक यांनी केला. ‘मला सर्वांच्या उपस्थितीत उपोषण सोडायचे होते. मंत्री, सीजेपीचे नेते आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असताना उपोषणाची सांगता करायची होती. मात्र, दिल्लीत काहीतरी मोठे घडू शकते आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वांगचूक यांच्या या नव्या आरोपांमुळे त्यांच्या उपोषणाच्या सांगतेनंतर निर्माण झालेला संशय आणि राजकीय वाद पुन्हा चर्चेत आला आहे. दुसरीकडे, अभिषेक दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच असल्याने नीट पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अद्यापही तापलेला आहे.


