मुंबई प्रतिनिधी
‘पुन्हा दिसलात तर तुमच्या खिशात ५० ग्रॅम पावडर टाकेन. तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि जामीनही मिळणार नाही,’ अशा शब्दांत काही मुलांना धमकावणाऱ्या मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पोलीस अधिकारी मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर गृह विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, सायन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. या व्हिडीओमध्ये संबंधित अधिकारी काही मुलांशी दमदाटीच्या स्वरूपात बोलताना दिसत आहे. यावेळी ‘५० ग्रॅम पावडर खिशात टाकेन, पूर्ण आयुष्य वाया जाईल आणि जामीनही मिळणार नाही,’ अशा आशयाची धमकी देण्यात आल्याचे व्हिडीओतून समोर आले आहे.
इतकेच नव्हे, तर ‘माझ्यासारखा वाईट कोणी नाही. तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे,’ अशा शब्दांतही संबंधित अधिकारी मुलांना सुनावत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडूनच नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचे या व्हिडीओमधून समोर आल्याने समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळली.
व्हिडीओ व्हायरल होताच गृह विभागाची तातडीने कारवाई
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच गृह विभागाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. सायन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडीओची सत्यता, त्यामागील नेमकी पार्श्वभूमी आणि संबंधित पोलीस अधिकारी व मुलांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला होता, याची चौकशी केली जाणार आहे. चौकशीतून समोर येणाऱ्या वस्तुस्थितीनुसार संबंधित अधिकाऱ्यावर पुढील प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचे समोर आल्याने या घटनेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः तरुण मुलांना अशा प्रकारे धमकावल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे हे प्रकरण चर्चेत आले असले तरी, व्हिडीओतील संभाषणाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि त्याची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या कथित वक्तव्याची गंभीर दखल घेत गृह विभागाने तातडीने निलंबनाची कारवाई केल्याने या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत नेमके काय समोर येते आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


