धुळे/नाशिक प्रतिनिधी
राज्यातील शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित प्रशांत वाडिले याला धुळ्यातून अटक झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत तब्बल 160 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारामागील संपूर्ण रॅकेट उघड होऊ लागले आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याचे तपासातून समोर आले असून या प्रकरणात शिक्षण विभागातील काही अधिकारी, एजंट आणि शाळा व्यवस्थापनांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत वाडिले सर्वप्रथम कमी पटसंख्या असलेल्या खासगी अनुदानित शाळांचा शोध घेत असे. अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या असत. याच परिस्थितीचा फायदा घेत तो शाळा व्यवस्थापन किंवा संबंधित शिक्षकांशी संपर्क साधत असे. त्यानंतर ऑनलाइन शैक्षणिक प्रणालीमध्ये बनावट नोंदी करून कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या प्रत्यक्षापेक्षा अधिक दाखवली जात असे.
विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरीत्या वाढविल्यानंतर त्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षकांची आवश्यकता असल्याचे दाखवून शिक्षक पदांना मंजुरी मिळवली जात होती. पुढील टप्प्यात शिक्षकांच्या नियुक्तीचे बनावट प्रस्ताव, खोट्या मंजुरी आणि आवश्यक कागदपत्रांची निर्मिती केली जात होती. या प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्काचा वापर करून हे प्रस्ताव मंजूर करून घेतले जात आणि संबंधित शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार केले जात असल्याचे तपासातून उघड झाले आहे.
एका आयडीसाठी 20 लाखांचा ‘फिक्स रेट’
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, एका शिक्षकाचा शालार्थ आयडी तयार करून देण्यासाठी प्रशांत वाडिले तब्बल 20 लाख रुपये घेत होता. एवढ्यावरच तो थांबत नव्हता. शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर संबंधित शिक्षकांचा अनेक महिन्यांचा किंवा वर्षांचा थकीत पगार मंजूर होत असे. या थकीत पगारातील तब्बल 50 टक्के रक्कम वाडिले स्वतःकडे घेत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तपास यंत्रणांनी आता त्याच्या विविध बँक खात्यांची, आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. कथित गैरव्यवहारातून उभारलेली मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
झडतीत धक्कादायक पुरावे
प्रशांत वाडिलेच्या निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या झडतीदरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. विविध शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असलेले कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर तसेच इतर संवेदनशील कागदपत्रे तपास पथकाच्या हाती लागली आहेत.
तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, संबंधित शिक्षकांनी भविष्यात पैसे देण्यास नकार दिल्यास किंवा व्यवहाराबाबत मागे हटल्यास त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी या कागदपत्रांचा वापर केला जात असावा. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती आणखी मोठी असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
27 शिक्षकांचे जबाब; दोन शाळा रडारवर
या घोटाळ्याच्या तपासात आतापर्यंत 27 शिक्षकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय दोन शाळांमधील भरती प्रक्रिया अत्यंत संशयास्पद आढळल्याने त्या शाळांच्या नियुक्त्या, मंजुरी आणि संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू आहे. तपासात आणखी अनेक शिक्षक, शाळा व्यवस्थापन आणि दलालांची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
मालेगाव ते पुणे; रॅकेटचे धागेदोरे विस्तारले
या प्रकरणाचे धागेदोरे आता मालेगाव आणि पुण्यापर्यंत पोहोचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. मालेगावातील काही एजंट प्रशांत वाडिलेच्या संपर्कात असल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच पुण्यातील एका प्रभावशाली व्यक्तीचाही या घोटाळ्याशी संबंध असल्याची चर्चा असून पोलिस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे शिक्षण विभागातील कथित संगनमत, बनावट नियुक्त्या आणि शासन निधीच्या गैरव्यवहाराचे नवे पैलू समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील शालार्थ प्रणालीतील हा घोटाळा आणखी मोठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काळात आणखी अटकसत्र आणि मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी नाकारलेली नाही.


