पुणे प्रतिनिधी
आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे तसेच श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेत विठुरायाच्या चरणी महाराष्ट्रातील वारकरी आणि शेतकरी सुखी राहावेत, असे साकडे घातले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणे ही अत्यंत आनंददायी आणि ऊर्जा देणारी अनुभूती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या संतपरंपरेतून समाजाला एकात्मता, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद लाभला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पुणे शहरातील पालखी मार्गावरील अडीअडचणी महापालिकेने दूर करत विविध सुविधांचा विस्तार केला असून, पुढील वर्षी आणखी व्यापक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
वारकरी सुखरूपपणे पंढरपूरला पोहोचावेत आणि यंदाची आषाढी वारी कोणत्याही अडथळ्याविना शांततेत पार पडावी, अशी प्रार्थना आपण विठुरायाच्या चरणी केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, पुणे शहरात टाळ-मृदुंगाच्या निनादात, ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘माऊली, माऊली’च्या अखंड जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती पताका आणि दिंड्या घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाले आहेत. उद्या सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे लोणी काळभोरकडे प्रस्थान होणार असून, त्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासणे, महापौर मंजुषा नागपूरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस सहआयुक्त संजय दराडे तसेच संत तुकाराम महाराज संस्थान आणि श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


