स्वप्नील गाडे, प्रतिनिधी
बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या काही काळापासून न्यायालयीन सुनावणीला दांडी मारून फरार घोषित झालेल्या (Proclaimed Offender) एका सराईत आरोपीला वांद्रे पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. खालिद जलालुद्दीन खान (वय ६५ वर्ष, रा. खेरवाडी, वांद्रे पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या वृद्ध आरोपीचे नाव आहे.
वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३०/२०२४ (मूळ न्यायालयीन खटला सत्र न्यायालय केस क्र. १२९/२०१६) मधील भा.द.वि. कलम १४१, १४४, १४७, १४८, १४९ आणि ५०६(२) अन्वये दाखल गुन्ह्यात हा आरोपी मुंबई सत्र न्यायालयात चालणाऱ्या सुनावणीला सतत गैरहजर राहत होता. आरोपी न्यायालयात हजर होत नसल्याने अखेर मुंबई सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध फेरअटकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा कसून शोध घेत होते.
दरम्यान, वांद्रे पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, फरार आरोपी खालिद खान हा शिवाजी नगर, खेरवाडी, वांद्रे पूर्व परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे वांद्रे पोलीस ठाण्याच्या पथकाने १० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास शिवाजी नगर परिसरात दबा धरून सापळा रचला. आरोपी परिसरात येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी वेढले आणि अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
या धडक कारवाईमुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून पळ काढणाऱ्या गुन्हेगाराला अखेर गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर यशस्वी कारवाई वांद्रे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित तवटे, पोलीस हवालदार मकानदार, पोलीस शिपाई घाडगे, पोलीस शिपाई काझी, पोलीस शिपाई रकटे आणि पोलीस शिपाई मोरे यांच्या विशेष पथकाने केली आहे.


