पाली प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदीत वाहून गेलेल्या सुमारे तीन हजार एलपीजी गॅस सिलिंडरच्या घटनेनंतर रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कडक इशारा दिला आहे. नदीतून किंवा खाडीतून मिळालेले सिलिंडर स्वतःजवळ ठेवणे, त्यांचा वापर करणे किंवा लपवून ठेवणे धोकादायक आणि कायद्याच्या दृष्टीनेही अयोग्य असल्याचे स्पष्ट करत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ते तातडीने प्रशासनाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Raigad,Maharashtra – Several empty cylinders of HPCL were washed away in a sudden flood at Chavane village in Khalapur taluka.The empty tanks had been brought to the HPCL plant in Chavane for processing and refilling. However, heavy rainfall on the hilltop caused a massive surge… pic.twitter.com/08PVx2k5XJ
— NextMinute News (@nextminutenews7) July 8, 2026
बुधवारी (८ जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएलच्या पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून अंदाजे तीन हजार भरलेले व रिकामे गॅस सिलिंडर पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर नदीकाठच्या परिसरात मोठी खळबळ उडाली.
पेण तालुक्यातील खारपाडा ते दादर गाव परिसरात नदी व खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर सिलिंडर वाहून आल्याने ते मिळवण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः चढाओढ केली. अनेक जण छोट्या बोटी घेऊन नदीत उतरले, तर पुलांवर आणि नदीकाठावर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. काहींनी सिलिंडर बाहेर काढून घरी नेल्याची माहितीही प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. एलपीजी सिलिंडरमध्ये ज्वलनशील वायू असल्याने त्यांची अयोग्य हाताळणी, साठवणूक किंवा वापर केल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे असे सिलिंडर स्वतःजवळ ठेवणे टाळावे आणि ते तातडीने संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने नागरिकांना मिळालेले सिलिंडर एचपीसीएल कंपनीकडे, जवळच्या अधिकृत गॅस वितरकाकडे, खालापूर किंवा पेण तहसील कार्यालयात अथवा संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे. सिलिंडर जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा त्यांचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वाहून गेलेल्या सिलिंडरचा शोध घेण्यासाठी एचपीसीएल आणि स्थानिक प्रशासनाकडून संयुक्त पातळीवर मोहीम सुरू असून नदीपात्र आणि खाडी परिसरात शोधकार्य सुरू आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणताही सिलिंडर आढळल्यास त्याची तात्काळ माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात धोकादायक वस्तूंच्या सुरक्षित साठवणुकीबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


