शेवगाव प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारतीय संविधान हे लोकशाहीचा आत्मा असून, त्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाही. संविधान बदलण्याची ताकद कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा सत्तेकडे नसून, अशा प्रकारचे स्वप्न पाहणाऱ्यांना जनता लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाला पुन्हा मजबूत करायचे असेल तर केवळ एका समाजापुरते मर्यादित न राहता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन व्यापक संघटन उभी करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आरक्षित जागेच्या भूमिपूजन, नागरी सत्कार आणि रिपब्लिकन पक्षाच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विविध समाजघटकांतील नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आठवले म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे प्रत्येक नागरिकाच्या समान हक्कांचे संरक्षण करणारे आहे. या संविधानामुळेच देशात लोकशाही बळकट झाली आहे. त्यामुळे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. भारतीय जनता संविधानावर ठाम विश्वास ठेवणारी आहे आणि संविधानाशी छेडछाड करण्याचा कोणताही प्रयत्न जनतेकडून हाणून पाडला जाईल.”
रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक बळकटीबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. “केवळ घोषणा देऊन, सोशल मीडियावर पोस्ट टाकून किंवा सभांमध्ये भाषणे करून पक्ष वाढत नाही. कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष केला पाहिजे. अन्यायाविरोधात उभे राहिले पाहिजे. मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, ख्रिश्चन, माळी, ओबीसी तसेच अनुसूचित जाती-जमातींसह सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन संघटना उभारली, तरच रिपब्लिकन पक्ष पुन्हा ताकदीने उभा राहू शकेल,” असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय दूरदृष्टीचा उल्लेख करताना आठवले यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्षाची संकल्पना ही कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नव्हती. “हा पक्ष संपूर्ण देशातील सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष म्हणून बाबासाहेबांनी उभा केला होता. त्यांना आणखी काही वर्षे देशाची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर ते देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचले असते,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
दलित पॅंथर चळवळीचा संदर्भ देताना त्यांनी कार्यकर्त्यांना इतिहासाची आठवण करून दिली. “एकेकाळी महाराष्ट्रातील गावागावांत दलित पॅंथरचे फलक झळकत होते. आज रिपब्लिकन पक्षाचे फलकही अनेक ठिकाणी दिसत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घराबाहेर पडून संघटनबांधणीसाठी झोकून द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
दलित पॅंथरच्या ‘वाघ’ या बोधचिन्हाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, “वाघ हा अन्यायाविरोधातील संघर्षाचे प्रतीक आहे. अन्याय सहन न करता सर्व समाजाला सोबत घेऊन त्याचा प्रतिकार करणे, हा दलित पॅंथरचा संदेश होता. आजही त्याच विचारांची समाजाला गरज आहे.”
सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना आठवले यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीप्रमाणेच मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जदारांनाही दिलासा मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या विजयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. “अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या यशात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे. भविष्यातही भाजप आणि रिपब्लिकन पक्ष युतीधर्म पाळत विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात गौतम सोनवणे, सुनील साळवे, अशोक गायकवाड, विजय वाघचौरे, श्रीकांत भालेराव आणि काकासाहेब खांबटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. समाजात जातीय सलोखा कायम राखण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी आरक्षणातील वर्गीकरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचा संकल्प, पक्ष संघटन बळकट करण्याचे उद्दिष्ट आणि सामाजिक सलोख्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
या कार्यक्रमास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे, अरुणराव मुंडे, अविनाश महातेकर, काका खंबाळकर, राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, श्रीकांत भालेराव, विजय वाघचौरे, बाबा राजगुरू, कैलास शिदे, रवि आरोळे, सुनील मोरे, निरंजन बोरुडे, बापू मगरे, राजेंद्र मगर, गौरव मगर, प्रदीप मोहिते, अमोल आहेर, राजू घुटे, निलेश जगधने, अमोल मोहिते, राकेश गरुड, बाबा खिलारे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध समाजघटकांतील महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


