पालघर प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारीही जोर कायम ठेवला असून, सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे मनोर–पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. विक्रमगड, वाडा, तलासरी, जव्हार आणि मोखाडा या भागांतही संततधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, वसई–विरार परिसरातील नालासोपारा येथे अद्यापही अनेक भाग पाण्याखाली असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेला बसला आहे. वसई-विरारदरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चर्चगेट ते डहाणू रोड या मार्गावरील लोकल सेवा विस्कळित झाली. अनेक लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असून, काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांचा स्थानकांवर खोळंबा झाला. कार्यालयीन वेळेत रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांवरील पाण्याची पातळी वाढल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डहाणू रोड–पनवेल, पनवेल–वसई रोड, वसई रोड–पनवेल, डहाणू रोड–बोरिवली, बोरिवली–वलसाड आदी सेवांचा समावेश आहे. तसेच विरार–सुरतदरम्यान धावणारी गाडी क्रमांक ६९१४१ ही वलसाडपासून सुरू करून सुरतपर्यंत चालविण्यात येणार असल्याने तिच्या नियोजित मार्गावरील काही सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
नालासोपारा, वसई आणि विरार परिसरात सखल भागांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. अनेक गृहसंकुले, दुकाने आणि रस्ते जलमय झाले असून, पाण्याचा निचरा मंदावल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला असून, स्थानिक प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. सूर्या नदीला पूर आला असून, वैतरणा, पिंजाळ आणि देहरजे नद्यांची पाणीपातळीही झपाट्याने वाढत आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांतही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जोरदार वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूकही संथ झाली. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, महसूल, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
धरणांतील पाणीसाठा वाढत असला तरी पूर्ण क्षमतेपासून दूर
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कवडास धरणात ४४.७८ टक्के, धामणी धरणात २९ टक्के, कुरझे धरणात ५१.५१ टक्के, तर वांद्री धरणात ६४.८४ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधील साठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. हवामानातील बदल आणि वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.


