नवी मुंबई प्रतिनिधी
डॉक्टर्स डेच्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिलेसह तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान दिलेल्या इंजेक्शनमुळे प्रकृती बिघडून हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला असून, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मृत महिलेचे नाव सोनम करण डोंगरे (वय १९) असे आहे. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. गर्भातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने तिला ऐरोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ३० जून रोजी दाखल करण्यात आले होते.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, उपचारादरम्यान तिला एक इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली आणि ती बेशुद्ध झाली. सुमारे तीन तासांनंतर तिला वाशी येथील महापालिका रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झाला. तिच्या गर्भातील बाळालाही वाचवता आले नाही.
याच कालावधीत त्याच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी एका गर्भवती महिलेलाही इंजेक्शननंतर प्रतिकूल प्रतिक्रिया आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महिलेवर सध्या वाशी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर नातेवाईकांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनीही प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मृत महिलेचे पती म्हणाले की, “पत्नीला नियमित प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर वाशी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या घटनेमागील सत्य समोर यावे आणि आम्हाला न्याय मिळावा.”
दरम्यान, या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी या घटनेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेबाहेरील चार महापालिकांतील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
या घटनेमुळे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशी अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


