सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने संगम माहुली विकास आराखड्याला १३२.९५ कोटी रुपयांची अंतिम प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या निधीतून महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांचे संवर्धन, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच धार्मिक आणि वारसा पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
शासनाच्या नियोजन विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या या आराखड्यात संगमेश्वर व रामेश्वर घाटांचे संवर्धन, निरीक्षण गॅलरीसह झुलता पूल, ऑडिओ-व्हिज्युअल माहिती केंद्र, शिवकालीन व इतर हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार, परिसराचे सौंदर्यीकरण आणि पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा समावेश आहे. ऐतिहासिक वास्तूंची मूळ रचना आणि वैशिष्ट्य अबाधित ठेवून भारतीय पुरातत्त्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे केली जाणार आहेत.
या विकास आराखड्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने आराखड्यास मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत दोन्ही टप्प्यांतील १३२.९५ कोटी रुपयांच्या कामांना अंतिम मंजुरी देण्यात आली.
योजनेअंतर्गत सातारा–कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गालगत ऐतिहासिक पर्यटन सर्किट विकसित करण्याचाही विचार असून, त्यामुळे संगम माहुली हे धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पहिल्या टप्प्यातील कामे
विकास आराखडा दोन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ६४.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये काशीविश्वेश्वर मंदिर व परिसराचे संवर्धन (८.७५ कोटी), काशीविश्वेश्वर घाट दुरुस्ती (३ कोटी), समाधिस्थळांचा विकास (३.४५ कोटी), विद्यमान समाधींचे संवर्धन (३ कोटी), संगम माहुली घाट बांधकाम (२०.२८ कोटी), परिसराचे सौंदर्यीकरण व लँडस्केपिंग (२.२५ कोटी), सभामंडप उभारणी (२.९५ कोटी), रस्ते विकास व परिसर सुशोभीकरण (३.८७ कोटी), घाट विकास (१.३५ कोटी) आणि विद्युतीकरणासाठी (३.६९ कोटी) निधी खर्च करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक महत्त्व
कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेले संगम माहुली हे मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे स्थळ मानले जाते. छत्रपती घराण्याशी निगडित महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी येथे असून, या स्थळाला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा त्रिवेणी वारसा लाभला आहे. नव्या विकास आराखड्यामुळे या वारशाचे जतन होण्याबरोबरच सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


