मुंबई प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात मान्सूनला नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने ३ ते ७ जुलैदरम्यान राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे प्रवाह पुन्हा सक्रिय होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून राज्यभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ३ ते ७ जुलै हा कालावधी महत्त्वाचा असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते.
यंदाच्या मान्सूनमध्ये सुरुवातीला अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला होता. पेरण्या रखडल्या होत्या, तर काही भागांत पेरलेले पीक पावसाअभावी धोक्यात आले होते. मात्र आता अपेक्षित पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यावर विशेष लक्ष
हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत जोरदार पावसाबरोबरच विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांचीही शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सानप यांनी सांगितले की, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे वारे काही प्रमाणात कमकुवत राहिले आहेत. त्यामुळे पावसाचे वितरण असमान झाले. पुढील वर्षीही एल निनोचा काही प्रमाणात परिणाम जाणवू शकतो. मात्र पुढील वर्षाच्या पावसाबाबत आताच निश्चित अंदाज व्यक्त करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रायगडला सलग पाच दिवस ऑरेंज अलर्ट
कोकणातील रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण रायगडमध्ये पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरल्याने भातलावणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत असून जलसाठ्यांमध्ये सुधारणा होत आहे.
हिंगोलीत शेतशिवार जलमय
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हयातनगर, लिंगी, पळशी आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. लहान-मोठे ओढे दुथडी भरून वाहत असून परिसरातील जलस्रोतांना नवसंजीवनी मिळाली आहे. महिनाभर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला असून खरीप पिकांच्या पेरणीला वेग येण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात नदी-नाल्यांजवळ जाणे टाळण्याचा, आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामानावर सर्वांचे लक्ष लागले असून हा पाऊस शेतीबरोबरच धरणसाठ्यांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.


