स्वप्नील गाडे, प्रतिनिधी
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणि तब्बल ११ वर्षांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार असलेल्या एका अट्टल आरोपीला अखेर वांद्रे पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हनीफ मुराद फाकी (वय ४३ वर्षे, रा. जनता सेवक सोसायटी, गौसिया मस्जिद जवळ, माहीम पश्चिम, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
वांद्रे पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये आरोपी हनीफ फाकी याच्याविरुद्ध गु.र.क्र. २४/२०१४, एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८(क), २२ आणि २९ अंतर्गत अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला मुंबई सत्र न्यायालयात (सेशन केस नं. ६७/२०१५) सुरू होता. मात्र, आरोपी हनीफ हा गेल्या ११ वर्षांपासून न्यायालयाच्या तारखेला गैरहजर राहून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध फेर अटक करण्यासाठी जाहीरनामा जारी केला होता.
या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने वांद्रे पोलिसांनी आरोपीचा शोध तीव्र केला होता. दरम्यान, आरोपी हनीफ मुराद फाकी हा माहीम दर्गा परिसरात येणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांच्या बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने माहीम दर्गा परिसरात सापळा रचला. बातमीदाराने वर्तवलेल्या वर्णनावरून पोलिसांनी दर्ग्याबाहेरील फूटपाथवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या हनीफ फाकी याला ताब्यात घेतले.
त्याला न्यायालयाच्या जाहीरनाम्याची सविस्तर माहिती देऊन वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि २७ जून २०२६ रोजी कायदेशीररीत्या फेर अटक करण्यात आली. ही यशस्वी कामगिरी वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांच्यासह त्यांच्या पथकातील अंमलदारांनी बजावली आहे. या अटकेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या गुन्ह्याच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता गती मिळणार आहे.


