मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या बंडखोर खासदारांनी पक्ष सोडताना निधी मिळत नसल्याचा आरोप करत नेतृत्वावर निशाणा साधला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“खूप खूप खूप धक्कादायक” अशा शब्दांत प्रतिक्रिया देत दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये फुटीर खासदारांना गेल्या दोन वर्षांत मंजूर झालेला खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (MPLADS) आणि त्यातील प्रत्यक्ष खर्चाची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती ‘एम्पॉवर्ड इंडियन’ या संकेतस्थळावरील आकडेवारीवर आधारित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दमानिया यांनी केलेल्या खुलाशानुसार, बंडखोर खासदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही त्यातील अत्यल्प रक्कम खर्च करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मंजूर कामांपैकी फारच कमी कामे पूर्ण झाल्याचेही या आकडेवारीतून समोर आले आहे.
खासदारनिहाय निधीची स्थिती
ओम राजेनिंबाळकर
मंजूर निधी : 18.5 कोटी रुपये
खर्च : 1.97 कोटी रुपये (10.7 टक्के)
मंजूर कामे : 130
पूर्ण कामे : 21 (13.9 टक्के)
नागेश पाटील आष्टीकर
मंजूर निधी : 19 कोटी रुपये
खर्च : 5.06 कोटी रुपये (26.6 टक्के)
मंजूर कामे : 79
पूर्ण कामे : 28
भाऊसाहेब वाकचौरे
मंजूर निधी : 14.7 कोटी रुपये
खर्च : 71 लाख रुपये (4.9 टक्के)
मंजूर कामे : 135
पूर्ण कामे : केवळ 2
संजय दिना पाटील
मंजूर निधी : 14.7 कोटी रुपये
खर्च : 15 लाख रुपये (1.1 टक्के)
मंजूर कामे : 40
पूर्ण कामे : एकही नाही
संजय देशमुख
मंजूर निधी : 18.06 कोटी रुपये
खर्च : 1.42 कोटी रुपये (7.6 टक्के)
मंजूर कामे : 106
पूर्ण कामे : 7
संजय जाधव
मंजूर निधी : 14.07 कोटी रुपये
खर्च : 3.78 कोटी रुपये (25.7 टक्के)
मंजूर कामे : 56
पूर्ण कामे : 25
निधी मिळाला; मग खर्च का झाला नाही?
फुटीर खासदारांनी पक्ष नेतृत्वावर निधी मिळत नसल्याचा आरोप केला असला, तरी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार संबंधित खासदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला दिसत आहे. त्यामुळे निधी न मिळण्याचा दावा आणि प्रत्यक्षातील खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याचे विरोधकांकडून सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे काही खासदारांनी मंजूर निधीपैकी 5 ते 10 टक्क्यांपेक्षाही कमी रक्कम खर्च केली आहे. काही ठिकाणी मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण न झाल्याची बाब समोर आल्याने स्थानिक विकासाच्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’नंतर नवा वाद
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “ऑपरेशन टायगर यशस्वी झाले” अशी घोषणा करत ठाकरे गटातील सहा खासदारांच्या प्रवेशाचे स्वागत केले. “हे खासदार खऱ्या शिवसेनेत आले आहेत. २०२२ मध्ये शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला होता, आता त्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीकाही केली.
मात्र, या राजकीय घडामोडीनंतर अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे बंडखोर खासदारांच्या निधीविषयक दाव्यांवर नवा वाद निर्माण झाला आहे. निधी मिळाला नसल्याचा आरोप करणाऱ्या खासदारांकडे प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचा मंजूर निधी उपलब्ध होता, असा दावा समोर आल्याने या मुद्द्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


